रत्नागिरी : बारावी बोर्ड परीक्षा झाली असली तरी विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे राबवली जाते. विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेचा गड सर झाला असला तरी प्रवेश परीक्षांची तयारी बाकी आहे. सीईटीची परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत. गुणवत्ता सिध्दकरण्यासाठी कोणी कॅश कोर्स तर कुणी स्वयंअध्ययनावर भर देत आहे.
उच्च शिक्षणासाठी बारावीचे वर्ष शैक्षणिक करिअरसाठी महत्वाचे असल्याने बोर्ड परीक्षांबाबत विद्यार्थी व पालक सजग असतात. बारावी बोर्ड परीक्षा यावर्षी लवकर संपल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती भरपूर वेळ आहे. परंतु पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशपरीक्षांचा टप्पा पार करायचा आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुरु झाल्या असून पदवीसाठी अभियांत्रिकी, औषध निर्माण, कृषी यांसह बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यात पार पडणार आहेत.
त्यामुळे बोर्ड परीक्षेसाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी किंबहुना जास्तच मेहनत प्रवेश परीक्षांसाठी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कोणी शिकवणी तर कुणी स्वयंअध्ययनाबर भर दिला आहे. प्रवेश परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. प्रवेश परीक्षांसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत.
बहुसंख्य विद्यार्थ्यांचे नंबर जिल्ह्याबाहेर…
जिल्ह्यातील या परीक्षेला बसलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे नंबर हे जिल्हाबाहेर असल्याचे दिसून येते. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि मुंबई याठिकाणी परीक्षा नंबर आलेले आहेत. जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या ही फारच कमी असल्याने विद्यार्थ्यांना परजिल्ह्यात जावे लागते. यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या जिल्ह्यात वाढवावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा केंद्रीभूत पद्धतीने राबवली जात असल्याने प्रवेश परीक्षेतही या विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे. चांगले कॉलेज मिळाले तर करिअरची पुढील वाट सुकर ठरणार आहे.
हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी लगबग….
विज्ञान शाखेतून बारावी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय शाखा अभियांत्रिकी, औषध निर्माण तसेच कृषीविषयक विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे राहत आहे. त्यासाठी पीसीबी व पीसीए या दोन ग्रुपच्या एमएचटी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यासाठी हॉलतिकीट सीईटी सेलच्या संकेत स्थळावर उपलब्ध झाले आहे ते डाऊनलोड करणे, प्रिंट काढणे यासाठी परीक्षार्थीची लगबग सुरु आहे. पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 08/Apr/2025












