रत्नागिरी : रत्नागिरी-मिऱ्या नागपूर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असताना कोंडगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठा आक्षेप नोंदवला आहे. रस्त्याशेजारील गावांना आणि वाड्यांना जोडणाऱ्या सर्विस रोडची तरतूद न झाल्याने आज कोंडगाव दळवीवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत चौपदरीकरणाचे काम रोखून धरले. गेल्या दोन वर्षांपासून हायवे विभाग आणि ठेकेदार कंपनी रवी इन्फ्रा फक्त आश्वासने देत असून, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांची मागणी काय?
दळवीवाडी, वाणीवाडी आणि आसपासच्या गावांतील रहिवाशांनी मेढे ते कोंडगाव मुरलीधरवाडीपर्यंत सर्विस रोडची मागणी केली आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या गावकऱ्यांना सुरक्षित प्रवास करता येईल, तसेच शालेय विद्यार्थी, व्यापारी आणि पाळीव जनावरांना रस्ता ओलांडण्यासाठी योग्य सुविधा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना रस्ता ओलांडताना होणारा संभाव्य धोका, नदी दुसऱ्या बाजूला असल्याने उद्भवणारा पाण्याचा प्रश्न आणि स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी होणारी हेळसांड यासारख्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दोन वर्षांपासून पत्रव्यवहार, तरीही उपाय नाही
ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून ते राजकीय पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले असून, त्यांना न्याय मिळालेला नाही. “विकासकामाला आमचा विरोध नाही, पण भविष्यातील धोके टाळण्यासाठी ही मागणी आहे,” असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यांनी हायवे विभाग आणि ठेकेदार कंपनीला सर्विस रोड किंवा योग्य पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर लवकरच यावर तोडगा निळाला नाही, तर त्यांचा संताप वाढू शकतो आणि आंदोलन तीव्र होऊ शकते. आता सर्वांचे लक्ष हायवे विभाग आणि रवी इन्फ्रा कंपनी काय उपाययोजना करते याकडे लागले आहे. या प्रकरणात तातडीने कार्यवाही न झाल्यास स्थानिकांचा उद्रेक अटळ आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 09-04-2025












