मंडणगड कचरा प्रश्न : ‘रत्नागिरी खबरदार’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे, भिंगलोलीत तातडीने कारवाई

मंडणगड, १२ एप्रिल २०२५: मंडणगड नगर पंचायतीकडून भिंगलोली गावाच्या हद्दीत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येचे वृत्त ‘रत्नागिरी खबरदार’ने आज सकाळी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली आणि भिंगलोलीतील कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी तातडीने चार कर्मचाऱ्यांना कामावर पाठवण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी या समस्येकडे लक्ष वेधल्याबद्दल ‘रत्नागिरी खबरदार’चे आभार मानले आहेत.

कचऱ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त, जनावरांचे जीव धोक्यात

भिंगलोली, पाट आणि सुर्ले गावांमध्ये मंडणगड नगर पंचायतीकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपांनुसार, गेल्या काही महिन्यांत प्लास्टिक खाऊन १२ ते १५ जनावरे दगावली, तर ६० ते ७० जनावरे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे. कचरा डेपो उभारण्यासाठी निधी उपलब्ध असतानाही मंडणगड नगर पंचायतीने डम्पिंग ग्राउंड न उभारल्याने हा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामस्थांचा संताप, आंदोलनाचा इशारा

गेल्या सहा महिन्यांपासून भिंगलोली गावातील ग्रामस्थांनी मंडणगड नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी निवेदने देऊन कचऱ्याची समस्या सोडवण्याची मागणी केली. मात्र, केवळ आश्वासनांवर बोळवण केली गेल्याचा आरोप आहे. भिंगलोली गावाचे माजी उपसरपंच राकेश साळुंखे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “नगर पंचायत करोडो रुपये खर्च करते, पण आमच्या गावातील जनावरांचे जीव धोक्यात टाकते. पुढील दोन दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास रस्ता बंद करू आणि सर्व जनावरे नगर पंचायतीच्या हद्दीत बांधू,” असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.

‘रत्नागिरी खबरदार’च्या वृत्ताचा परिणाम

‘रत्नागिरी खबरदार’ने भिंगलोलीतील कचरा संकटाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी रवाना करण्यात आले असले तरी, ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, कायमस्वरूपी उपाय म्हणून डम्पिंग ग्राउंड उभारले जावे. यामुळे भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 12-04-2025