पुण्यावरुन आंबा पेट्या उतरवून येणाऱ्या वाहनचालकाला तोतया पोलिसांनी लुटले

रत्नागिरी : आंब्याच्या पेट्या खाली करून गावी परतणाऱ्या कोकणातील एका पिकअप चालकाला पोलीस गणवेशातील दोघा अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक लाखाहून अधिक रुपयांची रक्कम चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रीतम काशिनाथ ओरपे (२७ वर्षे, रा. लाजूळ, रत्नागिरी) हे त्यांच्या भावाच्या मालकीची महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच०८-८५३७) मधून त्यांचे मित्र सुयोग नारायण लिंगायत यांच्यासोबत आंब्याच्या पेट्या भरून लाजूळ (रत्नागिरी) येथून पुणे येथे ९ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता निघाले होते.

दि. १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डात पोहोचले. त्यांनी तेथे त्यांचे भाऊ नितीन काशिनाथ ओरपे यांना बोलावून घेतले आणि तिघांनी मिळून लाजूळहून आणलेल्या आंब्याच्या पेट्या मार्केट यार्डातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या गाळ्यात उतरवल्या. त्यानंतर गाडीतील रिकामे कॅरेट भरून त्यांनी चहा-नाश्ता केला.

यावेळी प्रीतम यांचे भाऊ नितीन यांनी पहिल्या खेपेतील विकलेल्या आंब्याचे १ लाख १३ हजार रुपये कॅश एका कॅरीबॅगमध्ये भरून प्रीतम यांच्या गाडीतील क्लीनर सीटखाली असलेल्या बॉक्समध्ये ठेवले. त्यानंतर प्रीतम आणि सुयोग हे दोघेही त्यांची पिकअप घेऊन सकाळी ९.३० वाजता पुण्याहून निघाले.

पिकअप कात्रज रोड, खेडशिवामार्गे शिरवळ पास करून जात असताना, सुमारे ११.२५ वाजता सातारा-रत्नागिरी मार्गावर गाडीच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती हंटर बुलेटवरून आले आणि त्यांनी हाताने गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला.

सुयोग यांनी तत्काळ गाडी बाजूला थांबवली. त्या अनोळखी व्यक्तींनी त्यांची बुलेट सुमारे १०० फूट मागे ठेवली आणि ते प्रीतम यांच्या गाडीजवळ आले. त्यांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून दर्शवण्यासाठी ओळखपत्र दाखवले आणि गाडीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. यावेळी तपासणीचा देखवा करुन गाडीतील पैशांची बॅग घेवून पोबारा केला.

या प्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे प्रथम खबर क्रमांक ००५४, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३/३०३ (२) व भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३/२०४ नुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता दिघे आणि पोलीस निरीक्षक सुनील शेळके अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 14/Apr/2025