रत्नागिरी : विना परवाना आणि सेस न भरता पळून जाणाऱ्या मासे व्यवसायिकावर बाजार समितीची दंडात्मक कारवाई

रत्नागिरी : विना परवाना आणि सेस न भरता पळून जाणाऱ्या मासे व्यवसायिकाला बाजार समितीने दणका दिला आहे. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता वाहन क्रमांक MH-50-N-2700 मासे वाहतूक करत असताना कुवारबाव तपासणी नाक्यावर थांबविण्याचा प्रयत्न समिती कर्मचारी श्री. संजोग मयेकर यांनी केला. मात्र, वाहन चालक आणि मालकाने हुज्जत घालत धमकी दिली आणि सेस न भरता कोल्हापूरच्या दिशेने पळ काढला.

बाजार समितीचा कठोर पवित्रा
हा प्रकार समितीचे सभापती श्री. सुरेश सावंत, माजी सभापती श्री. गजानन पाटील आणि सचिव श्री. पांडुरंग कदम यांच्या निदर्शनास आणल्यानंतर तात्काळ कारवाईचा सापळा रचण्यात आला. मूर्शी साखरपा तपासणी नाक्यावर समिती संचालक श्री. ओंकार कोलते यांच्या सहाय्याने वाहन थांबविण्यात आले. चौकशीदरम्यान चालक आणि मालकाने परवाना नसल्याचे कबूल केले. तरीही त्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आणि सेस भरण्यास नकार दिला.

कायदेशीर कारवाई आणि दंड
सचिव श्री. कदम यांनी विनापरवाना व्यवसाय हा फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आणि भा.द.वि. कलम 353 चा भंग झाल्याचे नमूद केले. अखेरीस कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होताच चालक आणि मालकाने चूक कबूल करत नियमित सेसच्या तिप्पट रक्कम दंड म्हणून भरण्याची तयारी दर्शवली. त्यांनी रक्कम भरली आणि भविष्यात असे वर्तन न करण्याची हमी दिली.

बाजार समितीचे आवाहन
सभापती श्री. सुरेश सावंत यांनी सर्व कृषी माल व्यवसायिकांना आवाहन केले आहे की, बाजार समितीचा परवाना घेऊन आणि सेस भरण्याचे नियम पाळावेत. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 14-04-2025