बिबट्याला बनवूया मित्र ! ‘सह्याद्री’च्या उपक्रम

रत्नागिरी : वाडीत रोज बिबट्या येतो, त्याला तुम्ही पकडून न्या, अशा तक्रारी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांतून वनविभागाकडे येतात. त्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी आम्ही काय करू शकतो, अशी मानसिकता नागरिकांमध्ये तयार व्हावी, असा प्रयत्न सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभागाने संगमेश्वर तालुक्यात रूजवण्यासाठी बिबट्या मित्र उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी बिबट्यांचा सर्वाधिका देवावर असलेल्या काही बैठकाही घेण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत सह्याद्रीचे संचालक प्रतीक मोरे म्हणाले, पहिल्या टप्प्यात गावातील बिबट्याची माहिती संकलित करून त्याचा गावात फिरण्याचा मार्ग आणि कालावधी शोधला जातो. त्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ही माहिती गोळा केल्यानंतर बिबट्याचा मार्ग बदलण्यावर उपाय करत आहोत. त्यामध्ये गावात येणाऱ्या मार्गावर प्रखर उजेडाचे उघडझाप करणारे सोलर लाईट लावले आहेत. प्रखर उजेड पडल्यामुळे बिबट्या घाबरतो. त्यामुळे तो शक्यतो मनुष्यवस्तीपासून दूर जातो. गावातून जाण्याचा मार्ग बदलण्यासाठी जंगलाच्या जवळ कृत्रिम पाणवठे निर्माण केले जाणार आहेत. तसेच गावातील उघड्या विहिरी बंदिस्त करणे, गोठे बंदिस्त करणे यासाठी आर्थिक मदतही देण्याचा प्रयत्न आहे. बिबट्या दिसला की त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे त्या गावातील ग्रामस्थांना कळविली जाते. जेणेकरून वाडी परिसरात फिरताना ग्रामस्थ काळजी घेऊ शकतात. बिबट्याला हाकलण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा त्याचा मित्र बनून त्याला सहकार्य करण्याची संकल्पना आहे.

वर्षात १५ बिबट्यांचा मृत्यू
रत्नागिरी, लांजा, राजापूर व संगमेश्वर या तालुक्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३२ ठिकाणी बिबट्यांसंदर्भातील तक्रारी वन विभागाकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्यातील १७ ठिकाणी विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला जीवनदान दिले. तर १५ बिबटे विविध कारणांमुळे मृत पावले आहेत. त्यात फासकीत अडकून, वाहनाने उडवल्यामुळे, आजारपण अशी कारणे आहेत.

सह्याद्रीने सुरू केलेल्या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य वन विभाग करीत आहे. संगमेश्वर तालुक्यातील चार गावांमध्ये प्रायोगिकतत्त्वावर कार्यवाही सुरू आहे. गावागावांत व्याख्यान, माहितीपत्रक देऊन जनजागृती करणे हे उपक्रम राबविले जात आहेत. बिबट्या हा निसर्गाचा भाग आहे, अशी भावना रूजविण्यासाठी पावले उचलली जात आहेत- प्रकाश सुतार, प्रादेशिक वन अधिकारी

बिबट्याविषयीची भीती कमी झाली तर कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्यासाठी मित्र हि संकल्पना सहकार्याने सर्वाधिक तक्रारी असलेल्या गावांत राबवणार. दक्षिण रत्नागिरीतील चारही तालुक्यांत बिबट्याला मानवाकडून धोका आहे. त्यात फासकी, वाहनांची धडक, उघड्या विहिरीत पडणे आदींचा समावेश आहे- प्रतीक मोरे, संचालक, सह्याद्री संकल्प सोसायटी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 14/Apr/2025