रत्नागिरी : सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची पावले आपसुकच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत. त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी शनिवारपासूनच गर्दी होती. गणपती मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत साधारण ६५ हजार भाविकांनी दर्शन घेतले. सर्वाधिक गर्दी रविवारी (ता. १३) होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पर्यटक येऊ लागल्यामुळे पर्यटन व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे. त्यामुळे दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळी सुटीत पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी दाखल होतात. गेल्यावर्षी सलग आलेल्या निवडणुकांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी कालावधी कमी मिळाला होता. ती उणीव यंदा भरून निघालेली आहे. दहावी, बारावी बोर्डासह काही शाळांच्या वार्षिक परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. या आठवड्यात शनिवार, रविवार आणि आज (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा तीन सुट्या जोडून आल्या. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. रविवारी एकाच दिवशी सुमारे ३५ हजार पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले. उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी १५ हजार पर्यटकांची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्यामुळे किनारी भागातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. या तीन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असा अंदाज आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे शहाळ्यांना प्रचंड मागणी होती. ५० ते ७० रुपयांप्रमाणे शहाळे विक्रीला जात आहेत. परजिल्ह्यातून आलेले पर्यटक निवासाला प्राधान्य देत होते. त्यामुळे सायंकाळी किनाऱ्यावर गर्दी अधिक होती. दरम्यान, यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत पर्यटकांची रेलचेल कायम होती.
सुविधांचा अभाव
गणपतीपुळे परिसरात प्रचंड गर्दी असली तरीही सोयीसुविधांच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. अधूनमधून सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर येते, खड्ड्यांमुळे वाहने चालवताना होणारा त्रास, याचा परिणाम पर्यटनावर होऊ शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 15-04-2025
