रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित केला आहे. हा दरबार दि. १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत जिल्हा नियोजन समिती सभागृह, रत्नागिरी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार आहे.
डॉ. उदय सामंत हे महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे सक्रिय आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. उद्योगमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्यरत असलेले सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणण्यात यश मिळवले आहे.
राज्याच्या राजकारणात व्यस्त असतानाही डॉ. उदय सामंत आपल्या मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवतात. ते प्रत्येक आठवड्यात किमान एकदा आपल्या मतदारसंघाला भेट देतात आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. याच पार्श्वभूमीवर उद्याच्या जनता दरबाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या जनता दरबारात नागरिक आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांबाबत थेट उद्योगमंत्र्यांशी संवाद साधू शकतील. रत्नागिरीतील नागरिकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 16-04-2025














