… अन्यथा गिरणी कामगार रस्त्यावर उतरतील- सचिन अहीर

चिपळूण : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण राबवित आहे. त्यामुळे येत्या १ मे पर्यंत राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर बैठक बोलावली नाही, तर कामगार रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध एल्गार पुकारतील, असा खणखणीत इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहीर यांनी (दि. १५) कामगार आणि वारसांच्या भरगच्च सभेत दिला. सभागृहाने हात उंचावून या लढ्याला आपली संमती दर्शवली आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्रावर राज्य सरकारने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे कामगारांमध्ये सर्वत्र असंतोष पसरला होता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या वतीने परेल येथील महात्मा गांधी सभागृहात पुढील लढा ठरविण्यासाठी घरांसाठी फॉर्म भरलेल्या कामगार आणि वारसांची सभा झाली. या सभेला मुंबईसह कोकणातील कामगार आणि वारसांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.

गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसनातील घरे मिळावीत, घरकूल योजनेनुसार म्हाडा आणि महापालिकेला मिळणाऱ्या एक तृतियांश हिश्यातील ५० टक्के जमीन गिरणी कामगारांना घरांसाठी मिळाली पाहिजे, बंद एन.टी.सी गिरण्यांच्या जमिनी, गिरणी कामगारांना घरांसाठी प्राधान्याने मिळाल्याच पाहिजे, या तीन प्रमुख मागण्या सचिन अहिर यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. सरकारने वांगणी शेलु येथील अतिदूरच्या आणि महागड्या प्रस्तावित योजनेवरही आ. सचिन अहीर यांनी घणाघाती टीका केली.

याप्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर यांची भाषणे झाली. सर्वश्री सुनील अहिर, राजन लाड, उत्तम गिते आदी पदाधिकारी, तसेच चाळ रहिवाश्यांतर्फे किरण गावडे यावेळी उपस्थित होते. सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांकडून अद्याप बैठक नाही
यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, गिरणी कामगारांना मुंबई अथवा उपनगरात घरे मिळणे शक्य आहे. तसेच बोरिवली खटाव मिलची गोविंदराव मोहिते जमीन, एनटीसी मिल क्र.१-२ च्या जमिनीवर उभे राहणाऱ्या वस्त्रोद्योग म्युझियम येथील उर्वरीत जागा, इंदू मिल क्र.४, सीताराम, मधुसूदन, जाम कोहिनूर क्र.१ व २ या सहा गिरण्यांच्या जमिनी सरकारने उपलब्ध करून दिल्या तर घरांचा प्रश्न मार्गी लागेल, मुख्यमंत्र्यांना घरांच्या प्रश्नावर किमान पाच पत्रे पाठवूनही अद्याप बैठक बोलावण्यात आली नाही, याचाबतही मोहिते यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 17/Apr/2025