गणेशगुळे किनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपासणीसाठी हा मृतदेह पाठविला आहे.

१६ एप्रिलला रात्रीच्यावेळी रनपार परिसरातील काहीजण मासेमारीसाठी गेले होते. गणेशगुळे ते रनपारदरम्यानच्या समुद्रकिनारी मासेमारीसाठी गरवत असताना त्यांना एक मानवी सांगाडा सापडला. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठच्या दरम्यान गणेशगुळे पोलिसपाटील संतोष लाड यांच्याशी मच्छीमारांनी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसपाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात खबर दिली.

पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान मानवी सापळा पुढील तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठवला. याबाबत ठाणे अंमलदार पोलिस श्री. माने यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘मानवी सापळ्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजली नाही. तो महिला अथवा पुरुष आहे याची तपासणी होणार असून, त्यानंतर त्याचा डीएनए तपासणीनंतर त्याचे वय आणि अन्य माहिती समजेल. या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेले तीन महिने एक गृहस्थ बेपत्ता आहे, तो अद्याप सापडलेला नाही. या मृतदेहाच्या डीएनएनंतरच तो कोणाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 18-04-2025