चिपळूण : तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची तयारी सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
रात्री-अपरात्री विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अलोरे शिरगाव पोफळी परिसरात शनिवारी विद्युतवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. लगतच्या दसपट्टी भागातही सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. चार ते पाच तास सलग वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेस खंडित होणारा वीजपुरवठा हा दोन ते तीन तासांनी सुरळीत होतो.
विजेवर अनेक दैनंदिन कामे अवलंबून असतात. वीज असेल तरच पाणीपुरवठा होतो; मात्र काही ठिकाणी पाणीपुरवठा होण्याच्या वेळेलाच बत्ती गुल होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे वीजही नाही आणि पाणीदेखील मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्यावेळी वीजपुरवठा पूर्ववत होतो, त्यावेळी पाण्याची वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानावरदेखील त्याचा परिणाम होतो.
उन्हाळा चालू असल्याने परिसरात डासांची पैदासही वाढली आहे. परिणामी वीज नसल्याने पंख्याअभावी डासांच्या उपद्रवामुळे मलेरिया आणि डेंगीचे आजार पसरण्याचा धोका आहे. अनेक ठिकाणी रात्रभर लाईट जाते. रात्रभर वीज नसल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागत आहे
मागील आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, दिवसा आणि रात्रीदेखील उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत मागील दोन आठवड्यांपासून सावर्डे परिसरात दररोज विद्युतपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खंडित होत आहे. विशेषतः दिवसा वीज गेल्यावर व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे- बळवंत पवार, ग्रामस्थ, सावर्डे बाजारपेठ
सध्या उन्ह अधिक तापू लागले आहे. त्यामुळे उष्णतादेखील वाढली लागायच्या. यंदा एप्रिलअखेर पर्यंत परीक्षा असल्यामुळे मुलांना वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उकाड्यात व मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. दोन तासांनंतरच वीज येते- महेश शिंदे, रहिवासी, अलोरे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 21/Apr/2025
