चिपळूण पाणी योजनेविषयी ५ मे रोजी संयुक्त बैठक

चिपळूण : चिपळूण शहरासह परिसरातील गावांना प्रतीक्षा असलेल्या पाणी योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये एक हेक्टरच्या भूसंपादनसाठी बुधवारी (ता. २३) प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली धामणवणे ग्रामपंचायत कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली. यामध्ये धामणवणेसाठी टॅब द्या, अशी मागणी धामणवणे सरपंचांनी केल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी ५ मे रोजी संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

चिपळूण शहरासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेवर सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. ग्रॅव्हिटी योजनेत येथील डोंगरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन सुरू आहे. या भूसंपादनासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी बुधवारी धामणवणे ग्रामपंचायत कार्यालयात जनसुनावणी घेतली; मात्र या सुनावणीला कोणाचाही विरोध नव्हता.

धामणवणे गावचे सरपंच सुनील सावंत यांनी चिपळूण शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेतून गावासाठी एका टॅबची मागणी केली आहे, मात्र या योजनेतून ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याचा अधिकार पालिका अथवा प्रशासनाला नाही. त्याला शासनाची मान्यता आवश्यक आहे. या बाबींवर संयुक्तपणे चर्चा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेखर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन आहे. सुनावणीला मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 24/Apr/2025