खेड : रत्नागिरीमधील राज्य सरकारने मालगुंड हे पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गावोगावी असलेली पुस्तकांची रक्षणकर्ती ग्रंथालय मात्र सरकारच्या उदासीन धोरणाची बळी पडत आहेत.

खेड येथील नगर वाचनालयाचा देखील अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. घटणारी वाचक संख्या आणि ग्रंथालय चालवण्यासाठी संचालकांची होणारी ओढाताण यामुळे जागतिक पुस्तक दिनी तरी सरकारला खेड नगर वाचनालय प्रमाणेच सुरू असलेले ग्रामीण भागातील ग्रंथालयाची आर्त हाक ऐकू जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे ग्रंथ हेच गुरू मानून ज्यांनी जीवन व्यतीत केले त्यांनी मानवी समाजाला दिशा दिली हा इतिहास आहे.
परंतु आधुनिक काळात ग्रंथ संपदा सांभाळणाऱ्या ग्रामीण भागातील ग्रंथालयांची राज्यासह देशात दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. सरकार कडून मिळणाऱ्या अनुदानात आणि घटत्या वाचक संख्येत ग्रंथालये चालवणे दिवसेंदिवस कठीण बनू लागली आहे. या परिस्थितीचा कोकणातील खेड येथे दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र दिनी स्थापन झालेल्या नगर बाचनालयाची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. गेले ७८ वर्षे ही वाचनालय सुरू ठेवण्यासाठी येथील पुस्तक प्रेमी धडपड करत आहेत.
एका बाजूला २३ एप्रिल रोजी जगभर जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तके आणि लेखक यांचं महत्व पटवून देणे, आणि साहित्य व बौद्धिक संपत्तीबाबत जनजागृती निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात ११ हजार ग्रंथालये आहेत. त्यांच्या वर्गवारीनुसार त्यांना वार्षिक ६ लाख रुपये पर्यंत सरकार कडून अनुदान देखील दिले जाते.
मात्र या अनुदानात तेथील ग्रंथपाल, शिपाई यांचा पगार, पुस्तक खरेदी, पुस्तकांच्या देखभाल दुरुस्तीला येणारा खर्च सांभाळणे या ग्रंथालयांना कठीण बनले आहे. खेड नगर वाचनालयात ३४ हजार पेक्षा जास्त पुस्तके असून त्यांना ठेवण्यासाठी उत्तम दर्जाची कपाटे देखील येथे उपलब्ध नाहीत. इमारत जुनी झाली असून या इमारती भोवती अनधिकृत दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पुस्तक प्रेमी नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
युनेस्कोने २३ एप्रिल ही तारीख विल्यम शेक्सपियर, मिगेल डी सर्वांतस आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा या महान साहित्यिकांचे मृत्युदिन असल्याचे जागतिक ग्रंथालय दिन म्हणून जाहीर केला आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी खेड मध्ये १५ ऑगस्ट १९४७ रोजी खेड नगर वाचनालयाची स्थापना करण्यात आली. सहाशे पेक्षा जास्त सभासद या ग्रंथालयात आहे. आजही या ग्रंथालयात ३४ हजार ४१४ पुस्तके आहेत. प्रति सभासद अनामत रकम १०० रुपये तर प्रति पुस्तक १५ रुपये मासिक सभासद शुल्क आकारण्यात येते. परंतु आता घटती वाचक संख्या आणि वाढता खर्च यांचे गणित जुळताना दिसत नाही.
नोंदणीकृत ग्रंथालयांना अनुदान वाढवणे आवश्यक
ग्रंथालयांना सरकार अनुदान देते मात्र ते अनुदानात ग्रंथपाल, शिपाई यांना पगार देण्याएवढे देखील पुरेसे नाही. त्यातच देखभाल दुरुस्ती, पुस्तक खरेदी यांचा देखील भार असतो. त्यामुळे सरकारने वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यानगर वाचनालयांना पुरेसे अनुदान व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत खेड नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळाराम खेडेकर यांनी व्यक्त केले.
सरकारने कार्यरत ग्रंथालयांना हातभार द्यावा
ग्रंथ आणि ग्रंथालय यांची गरज वाचनाची सवय लावणे, पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती वाढवणे, बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे यासाठी जेवढे आवश्यक आहे त्या पेक्षा जास्त सुजान व सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी ग्रंथालय टिकणे व वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने कार्यरत ग्रंथालयांना हातभार द्यावा, असे मत शशांक सिनकर यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 25/Apr/2025












