गुहागर : साखरीआगर गावात ‘आयसीएमआर’ शोधणार दिव्यांगत्वाची कारणे

गुहागर : तालुक्यातील साखरीआगर गावात दिव्यांगत्व दिव्यांगत्व (मतिमंदत्व) दोष असलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या पथकाने या सर्व रुग्णांची तपासणी, इतिहास याची तपशीलवार नोंद करून घेतली आहे. तसेच रक्ताचे नमुनेही घेतले आहेत. याबाबत अधिकचे संशोधन करून या समस्येची कारणे भारतीय वैद्यक संशोधन परिषद शोधणार आहे.

साखरीआगर गावात १८ पेक्षा कमी वयाची ८ मुले आहेत. एकाच कुटुंबात तीन मुले दिव्यांग आहेत. या गंभीर समस्येची कारणमिमांसा शोधण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे पथक आज साखरी आगरमध्ये आले होते. बालकल्याण समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अनुलोम संस्थेच्या माध्यमातून या समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. साखरी आगरात दिव्यांग मुलांची संख्या अधिक असल्याचे बालसंगोपन समितीच्या निदर्शनास आले. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी हा विषय आयसीएमआर म्हणजेच वैद्यकीय संशोधन परिषदेपर्यंत पोचवला. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे डॉ. शैलेश पांडे यांनी या समस्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साखरीआगर गावाला भेट देण्याचे निश्चित केले. यासाठी समन्वय म्हणून अनुलोमनेही सहभाग घेतला.

बुधवारी (ता. २३) भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे डॉ. शैलेश पांडे, डॉ. धनजित दास, डॉ. शैनी जोसेफ, शायनी बाबू, किसन माळी असे पथक साखरीआगर ग्रामपंचायतीत आले. साखरीआगर ग्रामपंचायत, हेदवी आरोग्यकेंद्र व स्थानिक आशासेविकांनी ८ दिव्यांग मुले व त्यांचे पालक तसेच ७दिव्यांग तरुण यांना ग्रामपंचायतीत एकत्र केले होते. या वेळी सरपंच दुर्वा पाटील, उपसरपंच सुदाम आंबेरकर, वैद्यकीय अधिकारी जांगोड, बालकल्याण समितीचे शिरीष दामले, जनसेवक मयुरेश पाटणकर उपस्थित होते.

जनुकीय दोष असलेल्या कुटुंबातील व्यक्ती या दोषांच्या वाहक असतात. अज्ञान, दोष समजला तरी योग्य उपचार न मिळणे यामुळे हा दोष पुढील पिठीत संक्रमित होत राहतो. अशा ७ हजार जनुकीय आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. साखरीआगरमधील रुग्णांमध्ये कोणते दोष आहेत, याची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. संकलित माहिती व रक्तनमुन्यांच्या संशोधनानंतर उपचारांची नेमकी दिशा ठरवता येईल -डॉ. शैलेश पांडे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर