मुंबई : सरळ सेवा भरती सन 2019 अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण 1058 उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.
सन 2019 च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे 337 उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व 721 उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा.प.सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी रा.प.महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या सर्व उमेदवारांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत.
शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 09-10-2024