सागरी महामार्गावरील खाडी पुलांच्या कामांना सुरुवात

गुहागर : कोकणातील सागरी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ८ खाडी पुलांपैकी ६ खाडी पुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामाला सुरुवात झाली आहे तर बाणकोड आणि दाभोळ खाडीपुलांच्या निविदा ७ जूनला उघडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सागरी महामार्गाचे काम सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड या पुलांच्या बांधकामाची पूर्व तयारी ठेकेदाराने सुरु केली आहे. जमिनीत तसेच खाडीच्या तळाशी असलेल्या भूभागाच्या परीक्षणाचे काम सुरु झाले आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. त्यासाठी या ठेकेदाराने तवसाळमध्ये सुमारे २ एकर जागेत कामगारांसाठी वसाहत, काँक्रीट प्लांट, पुलाचे गर्डर तयार करण्यासाठी रॅम्प, लोखंडी सळईंच्या जोडणीसाठी स्वतंत्र शेड अशा उभारणीला सुरुवात केली आहे. हा खाडीपूल ७०० कोटी रुपयांचा आहे.

या सागरी महामार्गावरील सर्वात लांब पुल धरमतर खाडीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी १०.२ कि. मी. इतकी आहे. अगारदांडा खाडी पूल ४.३ कि.मी., कुंडलिका खाडी पुल ३.८ कि. मी., जयगड खाडी पुल ४.४, काळबादेवी खाडी पुल १.८ कि.मी., आणि कुणकेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावरुन जाणारा पूल १.६ कि.मी, लांबीचा आहे. या सर्व पुलांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली आहे. यापैकी काही पूल हे केबलच्या आधाराने उभारण्यात येणार आहेत.

या महामार्गाच्या उपलब्धे विषयी बोलताना तवसाळचे ग्रामस्थ नीलेश सुर्वे म्हणाले की, भविष्यात कोकणात रिफायनरी, अणुऊर्जा हे दोन मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. हे दोन्ही प्रकल्प सागरी महामार्गाच्या लगत आहेत. गुहागरमधील कोकण एलएनजी आणि रत्नागिरी गॅस हे दोन्ही प्रकल्पही सागरी महामार्गालगत आहेत, त्यामुळे हा महामार्ग पर्यटनाबरोबरच आर्थिक विकासालाही चालना देणारा आहे. पारंपरिक मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक या महामार्गामुळे काही प्रमाणात वळेल. त्यामुळे सागरी महामार्गाबर हॉटेल, लॉज यासारखे नवे व्यवसायही उभे रहातील. त्यामुळे नवा मार्ग रोजगाराच्या नव्या संधी घेवून येणार आहे. त्याची झलक सध्या तवसाळमधील ग्रामस्थांना पाहायला मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 28/Apr/2025