आवक वाढल्याने हापूसचा दर घसरला

रत्नागिरी : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविण्यासाठी आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत ५५ ते ६० हजार पेट्या कोकणातून वाशी बाजार समितीमध्ये पोहोचल्या आहेत. हापूसची आवक वाढल्यामुळे बाजारात दर्जेदार फळाला डझनचा दर ७०० रुपये आहे. एप्रिलच्या अखेरीस दर खाली आल्यामुळे बागायतदारांची चलबिचल सुरू झाली असून, यंदा उत्पादन कमी असल्याने खर्च भरुन कसा निघणार, अशी चिंता सतावत आहे.

उशिरा पाऊस, अपुरी थंडी आणि वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या फलधारणेवर गंभीर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या दरम्यान आलेल्या मोहोरामधून अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर दिसत आहे.

मार्चमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून सर्वात कमी पेट्या मुंबईतील वाशी बाजारात नोंदल्या गेल्या. आवक कमी राहिल्याने मार्चमध्ये दर अधिक होता. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किमतीत वाढ झाली. पण, त्यानंतर पुरवठा वाढल्यामुळे हापूसच्या किमतीत घट होऊ लागली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाल्याचे बागायतदारांनी सांगितले.

दराची घसरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. एप्रिलच्या अखेरीस वाशी बाजारात पाच डझनच्या पेटीला ३५०० रुपये दर मिळत आहे. सर्वात कमी दर्जाच्या आंब्याला १५०० रुपये दर आकारला जात आहेत. पुणे, मुंबईतील बाजारपेठांमध्ये कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढलेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बागायतदार मोठ्याप्रमाणात आंबा विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे दर कमीच होतो; परंतु यंदा अक्षय्य तृतीयेपूर्वी दर कमी झालेले आहेत. पिकलेले आणि कच्चे दोन्ही प्रकारचे हापूस आंबे आता मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवसांत बाजारातील हापूसची आवक आणखी वाढली तर दर अजून कमी होतील, अशी भीती बागायतदारांमध्ये आहे.

अक्षय्य तृतीयेनंतर आंबा कमी होत जाईल. सध्या बहुतांश व्यापाऱ्यांकडे मालच कमी आहे. सोमवारी, मंगळवारी दोन दिवस माल अधिक राहील. स्थानिक बाजारातही हीच परिस्थिती दिसेल. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर कॅनिंगला माल अधिक जाईल. ४५ ते ६५ कॅनिंग दर स्थिर राहील. त्यामुळे यंदा शेवटच्या टप्प्यात दर स्थिर राहतील- जयवंत बिर्जे, बागायतदार

सध्या वाशी बाजारात हापूसच्या सरासरी ६० हजार पेट्या येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दरही चांगला आहे. पुढे पेट्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हापूसचा बाजारातील दर स्थिर राहील. विविध देशांमध्ये निर्यात सुरू असल्याने स्थानिक बाजारात माल साठून राहत नाही. परिणामी दर स्थिर राहण्यास मदत होत आहे- संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 28/Apr/2025