खेड : १४४ वर्षानंतर प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्यात खेड तालुक्यातील तीन भाविक हरवल्याची धक्कादायक घटना घडली होती. भरणे गावातील सचिन चव्हाण, सिद्धांत राठोड आणि गिरजाबाई राठोड हे तीन भाविक कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दीत वाट चुकले होते.
प्रयागराज पोलिसांनी याची नोंद घेतल्यानंतर तात्काळ महाराष्ट्र पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर खेड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर हरवलेल्या भाविकांचे फोटो आणि माहिती प्रसारित करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर हे तिघेही भाविक २४ एप्रिल रोजी खेड शहरात सुखरूप परतले.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी भागुजी आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
हरवलेल्या भाविकांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. या घटनेमुळे कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 28/Apr/2025














