रत्नागिरी : मे महिना सुरू झाला तरीही रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे अजूनही प्रलंबित आहेत. ती वेळीच पूर्ण करणे गरजेचे आहे तसेच शहरातील वहाळांची तसेच गटारांची साफसफाई केली जावी, अशी मागणी नूतन मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
रत्नागिरी नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी गारवे यांची ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी गारवे यांचे पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, शकील मालदार, महिला विभागप्रमुख पूजा जाधव, रूपाली तवसाळकर, राजश्री लोटणकर, प्रवीण शिवलकर, विपिन शिवलकर, बाबू बंदरकर, तुषार कांबळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी रत्नागिरी शहरातील विविध समस्यांवर मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. मे महिन्यापूर्वी रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करणे गरजेचे होते; परंतु त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. ती कामे अजूनही प्रलंबित राहिली आहेत.
अनेकवेळा मे महिन्याच्या मध्यात पाऊस पडतो. त्यावेळी शहरामध्ये पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी केली. तसेच शहरातील वहाळांची आणि गटारांची साफसफाई अद्यापही सुरू केली नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली.
पाईपलाईन टाकण्याचे काम लवकर करा
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची पाईपलाईन टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे; मात्र ते पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर त्याचा त्रास रत्नागिकरांना सहन करावा लागेल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 29/Apr/2025














