चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभपक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सावर्डे येथे करण्यात आला. यावेळी कोकणातील विविध पावन भूमीतील माती व जल यांचे कलश संकलन करून त्याचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, दिशा दाभोळकर, पूजा निकम व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावातील पवित्र माती तसेच जिल्ह्यातील विविध नद्यांचे जल व महापुरुषांच्या गावातील माती कुंभात सावर्डेत एकत्र केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले.
दि. १ मे पासून मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश या कार्यक्रमात राज्यभरातील गौरव कलश आणले जाणार आहेत. तीन दिवस हा कार्यक्रम रंगणार असून यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 29/Apr/2025














