रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा यमुनाबाई खेर पुरस्कार पेढे-पर्शुराम (ता. चिपळूण) येथील आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनिता आत्माराम नारकर यांना प्रदान करण्यात आला.
साडी,चोळी, मानपत्र, श्रीफळ, पुष्प, गीताई व रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सर्वोदय छात्रालयाच्या सभागृहात श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश माणिकराव सातव म्हणाले, ट्रस्टचे काम करताना खुर्चीला चिकटून राहणारे विश्वस्त नकोत, तर समाजासाठी काहीतरी देणारे विश्वस्त आवश्यक आहेत. एखादी संस्था चांगली असली की तिचा आधार समाजातील अनेक कुटुंबांना होत असतो. त्यामुळे त्यांनी असे काम करत राहिले पाहिजे. यमुनाबाई खेर ट्रस्टचे कार्यही कौतुकास्पद आहे.
जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर आदी दुर्गम भागांत वीटभट्टी व तत्सम ठिकाणी काम करणाऱ्या दिव्यांगांना तपासणीनंतर लगेचच त्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. याकरिता विधी सेवा प्राधिकरण आणि आरती निराधार सेवा फाउंडेशन यांच्या विद्यमाने शिबिरे आयोजित करूया, जेणेकरून दिव्यांगांसाठी मदत मिळेल, असेही न्यायाधीश श्री. सातव यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, विश्वस्त पांडुरंग पेठे उपस्थित होते.
मानपत्राचे वाचन सदस्य वीणा काजरेकर यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ म्हणाले की, या सर्वोदय छात्रालयातून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, उच्च पदस्थ अधिकारी तयार झाले आहेत. विद्यार्थी घडवण्याचे काम ७५ वर्षे सातत्याने छात्रालय आणि श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट करत आहे. हे देशसेवेचे काम अशाच पद्धतीने अविरत सुरू राहील.
अध्यक्षीय भाषणात प्रा. गीते म्हणाले की, यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयात माणसे जोडण्याचा संस्कार केला जातो. या वसतिगृहात हजारो विद्यार्थी घडले. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून उत्तम देशभक्ती करण्याचे कार्य करण्यास शिकवणारी ही ट्रस्ट आहे. गेली ५० वर्षे मला या वास्तूच्या सहवासाचे भाग्य लाभले आहे.
खेर ट्रस्टचे विश्वस्त पांडुरंग पेठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे श्री. सातव यांचा सत्कार प्रा. गीते यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. बीना कळंबटे यांनी न्यायाधीश श्री. सातव यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गीते यांचा सत्कार व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके यांच्या हस्ते करण्यात आला. सौ. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. गजानन चाळके यांनी आभार मानले.
सत्काराला उत्तर देताना सौ. अनिता नारकर यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत प्रदीर्घ कालावधीत सेवा बजावली. मुलगी आरती हिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. माझ्या सेवानिवृत्तीनंतर २०१८ मध्ये पेढे-पर्शुराम येथे आरती निराधार सेवा फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. माझी श्रीमंती पैशाने नाही तर अनेक माणसांच्या मदत, ओळखीमध्ये आहे. सर्वोदय छात्रालयातील विद्यार्थ्यांना मदत लागल्यास त्यांनाही मदत करू.
यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे डॉ. दुर्गा खरे शिष्यवृत्ती सिद्धी लाखण (डीबीजे कॉलेज), कै. हेमलता गीते शिष्यवृत्ती मयुरी होरंबे (नवनिर्माण कॉलेज, लोवले, संगमेश्वर) आणि डॉ. दुर्गा खरे शिष्यवृत्ती मंजिरी सावंत (सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय), आर्या शिंदे (दामले विद्यालय) आणि विशाखा मोहिते (छत्रपती शिवाजी हायस्कूल) यांना देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 29-04-2025














