राजापूर : पावसाळी तीव्र हंगामात शहरात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीप्रसंगी महावितरणचे काही रोहित्र कमी उंचीमुळे पाण्यात बुडतात व काही वीजखांब भोवती पूराचा वेढा पडत असल्याने वीजपुरवठा सुरू ठेवण्यात अडथळे निर्माण होतात. दरवर्षी अशा पूराच्या पाण्याने वेढणारी रोहित्रे व वीजखांबांचे सर्व्हेक्षण करून ते लगतच्या सुरक्षित भागात हलवण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर यांना दिल्या आहेत.
याबाबतची लेखी मागणी ओबीसी समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती.
अशी पूराच्या पाण्याने क्षतीग्रस्त होणारी शहरातील विद्युत रोहित्रे व वीजखांब यांचे सव्र्व्हेक्षण नगर परिषदेचा विभाग व महावितरणचे शहर कार्यालय यांनी संयुक्तपणे करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यत्वेकरून जवाहर चौक व मुंशीनाका येथील रोहित्राचा व वैकुंठभूमी रस्त्यावरील वीजखांबांचा समावेश आहे.
राजापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नदीपात्रालगतच्या भागात काही रोहित्रे व वीजखांब आहेत. शहरात तीव्र पावसाळ्यात दरवर्षी कमीअधिक प्रमाणात पूरस्थिती असते. त्या काळात ही रोहित्रे व वीजखांब पूराच्या पाण्याने वेढली जातात एकतर वीजपुरवठा खंडित ठेवावा लागतो. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पूर ओसरेपर्यंत त्यामुळे काहीच हालचाल करता येत नाही. शहरात पूरस्थिती असताना नागरिक, व्यापारीवर्ग हवालदिल असतो त्यात वीज पुरवठा खंडित ठेवावा लागत असल्याने जनजीवन आणखीनच कोलमडून पडते.
यासाठी दरवर्षी महापूराप्रसंगी क्षतीग्रस्त होत असलेली रोहित्रे उंच ठिकाणी उभारावीत व नदीपात्रालगत असलेले व पुराच्या पाण्यात जाणारे काही वीजखांब लगतच हलवावे अशी मागणी शिवलकर यांनी केली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हे काम यंदाच्या पावसाळी हंगामापूर्वी करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. याची तत्काळ दखल घेत आमदार किरण सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 29/Apr/2025














