वाट पाहायला लावणे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही : खा. सुनील तटकरे

दापोली : नागरिकांपर्यंत चांगल्या सुविधा पोचविणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. या साठी लोकांच्या तक्रारी येईपर्यंत वाट पाहणे हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सुनावले. दि. २८ रोजी सोमवारी दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला दापोली उपविभागीय अधिकारी विजय कुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंये, दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, दापोली पोलिस निरीक्षक विवेक आहिरे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी मिळावे, या बाबत गटविकास अधिकारी यांना सांगून देखील लक्ष दिले जात नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी खासदार तटकरे यांना दिली. या संदर्भात खासदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर उद्यापासून टँकरची व्यवस्था होईल, असे सांगितले.

घरकुल योजना लाभार्थीना निकष लावून त्यांना घरापासून वंचित ठेवले जात आहे, अशी कैफियत स्वतः किन्हळ येथील सुमित्रा शंकर कांबळे यांनी आढावा बैठकीत खासदारांसमोर मांडली. तर दापोली पंचायत समिती आवारात अधिकचा खर्च करून ४ लाखांचा निधी खर्चुन डेमो इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीस तडे गेले आहेत. ही बाब देखील या वेळी खासदार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. स्वतः नियमबाह्य काम करता आणि सामान्य लोकांना निकष लावता अशा शब्दांत खासदारांनी यावेळी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

दापोली वनपालांच्या निलंबनाचा प्रस्ताव…
दापोली वनविभागाचे वनपाल हे नागरिकांना सहकार्य करत नाहीत. पंचनामे बदलले जातात, नागरिकांवर गुन्हे दाखल करू अशा धमक्या मिळतात. याबाबत बळीराजा शेतकरी संघटना यांनी खासदार सुनील तटकरे यांना आढावा बैठकीत लेखी निवेदन दिले. तर काही नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या. या वेळी तटकरे यांनी वनविभागाचे कोल्हापूरचे वरिष्ठ अधिकारी यांचेशी तत्काळ फोनवर चर्चा करून वनपाल यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना केल्या आहेत. तर या बाबत मी स्वतः पत्रव्यवहार करणार आहे, असे देखील तटकरे म्हणाले.

Sahyog multi.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 29/Apr/2025