साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही देवळे घाट वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेले काम, सुरू असलेले खोदकाम, ढासळलेली माती यामुळे यंदाही पावसाळ्यात रस्त्यातून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागणार आहेत.
मिऱ्या-नागपूर देवळेफाट्यापासून दाभोळे गावापर्यंत असलेला घाट हा देवळेघाट म्हणून ओळखला जातो. अवघा साडेतीन किमीचा हा घाट आहे. पण आता महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. गेल्या वर्षी या घाटातून पावसाळ्यात वाहतूक अत्यंत धोकादायक झाली होती.
देवळेफाटानजी जुन्या रस्त्याच्या कडेला डोंगरात जेसीबीने काम सुरु आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल झालेली माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल पसरण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दरडही कोसळून रस्त्यावर येण्याचा मोठा धोका आहे. टाक्याचा माळनजीक असलेले अवघड वळण रुंदीकरणात काढून टाकण्यात आले असले तरी उर्वरित रस्त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरणार हे नक्की आहे.
दाभोळे गावाच्या बाहेरून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी काजळी नदीवर लांजा रस्त्याच्यावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. हे कामही गेल्या दीड वर्षापासून अपूर्णच आहे. पुलाच्या खांबांचे काम दीड वर्षापासून सुरू असले तरी ते अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या परिसरातही रस्त्यावर खड्डाचे साम्राज्य पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 29/Apr/2025














