रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात योग कार्यशाळेची सांगता

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पीएम उषा कार्यक्रमांतर्गत योगशास्त्राद्वारे भारतीय ज्ञान परंपरा याविषयी पाच दिवशीय कार्यशाळा पार पडली. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये सांगता कार्यक्रम झाला. यावेळी पीएम उषा कार्यक्रम समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी व डॉ. सीमा कदम आणि या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होत्या. या वेळी डॉ. ठाकुरदेसाई यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करून या कार्यशाळेतील ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करण्याचे आवाहन केले.

उपप्राचार्य डॉ. गोस्वामी यांनी सांगितले की, योगशास्त्राचा सकारात्मक परिणाम मेंदू, शरीरावर व विचारावर होत असतो. एफडीपीअंतर्गत ही कार्यशाळा झाली. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासासाठी केला पाहिजे. पी. एम. उषा कार्यक्रम समन्वयक व उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सांगितले की, या कार्यशाळेचा उपयोग प्राध्यापकांना होणार आहे. प्राध्यापकांनी येथे शिकलेले आचरणात आणले तर त्याचा उपयोग शिकवताना नक्की होईल. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, कार्यशाळेत सहभागी जोशी- बेडेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष राणे, अमृता नवाथे, साक्षी चाळके आणि सबा बंदरी यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळेच्या उत्कृष्ट नियोजनाविषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेत भारतीय ज्ञान परंपरा व योग, योगशास्त्र व संशोधन, उपयोजित योग आणि समकालीन प्रासंगिकता, योग व तत्त्वज्ञान, भवितव्य यावर दुर्गादास सावंत, श्रीकांत ढालकर, रुद्राक्ष साक्रीकर, डॉ. जयश्री जोग, सानिका शेरे, मृणालिनी महागावकर, डॉ. हिमानी चौकर, डॉ. अतुल ढगे, डॉ. दिनकर मराठे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 30-04-2025