रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचा बीए योगशास्त्र तृतीय वर्षातील विद्यार्थी विशाल गवस याने द्वितीय आशियाई योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (वरिष्ठ अ २८ ते ३५) गटातून बॅकबेंडिंग योगासन वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
या आशियाई योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत जवळपास २१ देशातील २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा देशाची राजधानी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे २५ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान पर पडली. ही स्पर्धा केंद्र सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय, योगासन भारत, आशियाई योगासन व भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि आयुष मंत्रालय यांच्या एकत्रित मुख्य सहभागातून आयोजित करण्यात आली होती.
याआधी देखील विशाल गवस याने जिल्हा, राज्य, देशपातळीवर योग प्रकारात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. विशालच्या या सुवर्ण यशामुळे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या यशात भर पडली आहे. विशाल गवस याने मिळवलेल्या यशाबद्दल विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आणि रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“बीए योगशास्त्र अभ्यासक्रमाचा विद्यार्थी विशाल गवस याने भारतीय ज्ञान परंपरेतील योगशास्त्राच्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याने रत्नागिरी उपकेंद्राची मान उंचावली आहे. याआधी श्री विनय साने यांच्या रूपाने सुवर्णपदक आणि आता विशाल गवस याने सुवर्णपदक पटकावल्याने रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा आगामी काळात उत्कर्ष होणार आहे. त्यांच्यामुळे रत्नागिरीतील स्थानिक योगप्रेमी नागरिकांना प्रेरणा मिळणार ही निश्चित.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 30/Apr/2025














