वन्यप्राणी बचाव मोहिमेत दापोली वन विभाग अग्रेसर

दापोली : यावर्षी जिल्ह्यातील सर्वाधिक वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात दापोली वन विभागाला यश आले आहे. वर्षभरात तब्बल उपद्रव करणारी १ हजार ८५ माकडे, तर संकटातील २०५ वन्यप्राण्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून, वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानासाठी २३९ शेतकऱ्यांना तब्बल २६ लाख इतक्या भरपाईचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानभरपाईची रक्कम दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.

दापोली तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. २०२४-२५ मध्ये लोकवस्तीत आलेली, संकटात सापडलेली, साप, अजगर, मगर, कोल्हा, घोरपड, उदमांजर, घुबड, सिगल पक्षी, मानविध असे अनेक प्रकारचे २०५ वन्यप्राणी एसओपी पद्धतीने रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बचाव पथक प्रमुख, वनपाल, सह वनरक्षक जगताप आदी कर्मचाऱ्यांनी तसेच वाईल्ड अॅनिमल, रेस्क्युअर, सामाजिक संस्था यांच्या मदतीने पार पाडण्यात आली.

२०२४-२५ या वर्षात उपद्रवी ठरणाऱ्या १ हजार ८५ माकडांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. केळशी, केळशी बाजारपेठ, उटंबर, उंबरशेत, आसूद, आंबवली बु., रोवले, आडे, लोणवडी, अडखळ, आसुद, दापोली अर्बन सायंन्स कॉलेज, जालगाव, शिर्दे, खेर्डी, बोडीवली, मौजे दापोली, सारंग मोहल्ला, कळंबट, पालगड, सोंडेघर, बांधतिवरे, कुडावळे, कोंगळे, ताडील, शिवाजीनगर किरांबा, मडवळे या गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.

जिल्ह्यात सर्वाधिक माकडे दापोली तालुक्यात पकडली असून यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दापोली वन विभागातर्गत २०२४-२५ या संपलेल्या आर्थिक वर्षात वन्यप्राणी विवट, मगर यांच्या हल्ल्यामध्ये पाळीव प्राणी बकरी, पाडा, गाय बैल अशी एकूण २५ मृत जनावरे प्रकरणे घडली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना ४ लाख नुकसानीची रक्कम मंजूर केली आहे.
विभागाने खासगी क्षेत्रातील अवैध वृक्षतोड, वन अपराध एकूण ४० प्रकरणी इमारती जळावू लाकडासह एक जेसीबी, दोन ट्रक, दोन ट्रॅक्टर असा एकूण ८७ लाख ७१ हजार ५०० रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त करून २ लाख ३८ हजारांची रक्कम वसूल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 01/May/2025