रत्नागिरी : आगोटच्या कामाला वेग आला असून, पावसाळ्यापूर्वी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील आठवडा बाजार आणि शहरांमध्ये मसाले, सुकी मासळी, कांदे, बटाटे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. पावसाळ्यातील जेवणाची चव वाढवण्यासाठी महिलावर्ग लाल मिरची खरेदी आणि मसाले तयार करण्याच्या गिरण्यांवर गर्दी करत आहेत. महागाईमुळे मसाल्याचे पदार्थ आणि सुक्या मासळीचे भाव वाढले असले तरी, या पदार्थांना मोठी मागणी आहे. सुट्ट्यांसाठी चाकरमानी गावी परत येत असल्याने, मुंबईतील नागरिक देव्हारे, मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजारात विशेषतः भेट देत आहेत. यामुळे बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही, पावसाळ्यापूर्वी सुकी मासळी, तिखट, मीठ, कांदे आणि इंधनाची बेगमी करण्याची मानसिकता आजही कायम आहे. पावसाळ्यातील गरम मसाल्यांसाठी गावठी आणि घाटी मिरची कुटून पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करण्याची तयारी अनेक घरांमध्ये सुरू आहे. बाजारात रेडीमेड मसाले उपलब्ध असले तरी, अनेक कुटुंबे आजही आपल्या पारंपरिक पद्धतीनेच मसाले बनवतात.
पावसाळ्यात इंधन आणि धान्याची अडचण येऊ नये, यासाठी पूर्वापार चालत आलेल्या आगोटच्या तयारीसाठी शहर आणि परिसरातील महिलांची धावपळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी सुमारे पंधरा ते वीस दिवस आधी तालुक्यात आगोटच्या तयारीला सुरुवात होते. यासाठी सुकी लाकडे, मसाले, तिखट आणि सुकी मासळी गरजेनुसार साठवून ठेवली जाते. शहरात मिरची पावडर बनवण्यासाठी महिला गेल्या चार-पाच दिवसांपासून चक्कीवर गर्दी करत आहेत.
गणपतीपर्यंत अन्नधान्य, मसाले, सुकी मासळी आणि इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येक कुटुंब पावसाळ्यापूर्वी विशेष काळजी घेते. यंदा मिरची आणि इतर मसाल्यांचे भाव वाढले असले तरी, तसेच उष्णतेमुळे लवकर पावसाचे संकेत मिळत असल्याने महिलांनी आगोटच्या तयारीला जोर धरला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 PM 03/May/2025










