संगमेश्वरातील कामगारांना साहित्य वाटप

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याहस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कामगारांच्या साहित्य वाटपात कुणी गैरप्रकार करत असेल आणि तशी तक्रार आल्यास चौकशी करुन त्यांच्यावर पोलिस कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी
सांगितले.

रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, जिथे सात महिन्यांत १० हजारावरुन ५० हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील १ लाख महिला-भगिनींना भविष्यात कर्करोग होऊ नये म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून मोफत लस देण्याचा उपक्रम पुढील महिन्यापासून सुरु करणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्याचबरोबर अमलीपदार्थापासून जिल्ह्यातील नवीन पिढी दूर राहिली पाहिजे, यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी काम केले पाहिजे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी स्वागत करुन प्रास्तविक केले. कार्यक्रमास तहसीलदार अमृता साबळे, राहुल पंडित, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषदचे माजी सभापती बाबू म्हाप, प्रमोद पवार, सचिन मांगले, सनी प्रसादे, प्रसाद सावंत, देवरुख नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, माजी नगरसेवक वैभव पवार, मुख्याधिकारी विसपुते यांच्यासह नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 05/May/2025