चिपळूण : शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण कामामध्ये चिपळूण नगर परिषदेच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार काम करावे, अशी सूचना पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी (दि.३) महामार्ग रुंदीकरण संदर्भातील आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी काम करत असताना जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचित केले.
नामदार उदय सामंत यांनी शनिवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रीय महामार्ग विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी चिपळूण नगर परिषदेकडून विभागासंदर्भातील होणाऱ्या चुकीच्या कामांबाबत एका निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच काही नागरिकांनी महामार्गामधून शहराची पाण्याची पाईपलाईन जाते. त्या बाबतही सुरू असलेले काम चुकीचे असल्याचे निदर्शनास आणले. राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण नगर परिषदेला जुमानत नसल्याचे सांगण्यात आले. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना नगर परिषदेने अनेकदा कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे शहरात व महामार्गावर पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आणूनही महामार्ग विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त केली. एकूणच या विषयावर ना. सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून यापुढे शहरातील होणारे प्रत्येक काम चिपळूण न.प.च्या संबंधित विभागाच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसारच करावे.
ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणच्या पाण्याला मार्ग करून देण्याचे नियोजन करावे. तसेच शहराच्या पाणी योजनेचे पाईप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व न.प.च्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने तातडीने करून घेण्याची सूचना देतानाच शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा १ तास जरी बंद झाला तरी संबंधित अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करू, असा इशारा दिला. एकूणच या बैठकीत महामार्ग विभागाने नगर परिषद व परिसरातील अभ्यासू नागरिकांच्या मदतीने योग्य पद्धतीने काम करावे, अशी सूचना केली.
धोक्कादायक पॉवर हाऊस रस्त्याकडे वेधले लक्ष
चिपळुणातील महामार्ग रुंदीकरण अंतर्गत स्वा. सावरकर चौक (पॉवर हाऊस) हा सध्या वाहतुकीस धोकादायक बनला असून, त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी निवेदन दिल्यावर उबाठा सेनेचे बाळा कदम यांनी साहेब हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. या चौकात राजकीय फलक लावले जातात. तसेच अपघात होत आहेत. त्यावर महामार्ग विभागाकडून तातडीने कार्यवाही व्हावी, असे सांगितल्यावर ना. सामंत यांनी आमच्या मित्रपक्षाच्या शहर अध्यक्षांनी निवेदन दिले आहे. त्याची आम्ही दखल घेऊ आणि राजकीय फलक न लावण्याबद्दल तुमच्यापासून सुरुवात करा, असा टोला हाणला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 05/May/2025










