गोलमेज परिषदेत देवरुखच्या कन्येकडून भारताचे प्रतिनिधित्व!

साडवली : दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या गोलमेज परिषदेत देवरुखची सुकन्या दक्षता दीपक लिंगायत हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. जागतिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, आर्थिक स्थिरता वाढविणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे, विकसनशील देशांच्या गरजा आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करणे, जागतिक स्तरावरील समस्यांवर सहकार्य करणे या उद्देशाने गोलमेज परिषद आयोजित केली जाते.

1999 मध्ये स्थापन झालेला ‘जी-20’ हा जगातील सर्वात मोठ्या वीस अर्थव्यवस्थांचा समूह आहे. व्यापार, आरोग्य, हवामान आणि इतर मुद्यांवर जागतिक धोरणांचा समन्वय साधण्यासाठी बैठका घेण्यात येतात. दक्षिण आफ्रिका येथे नुकतीच यासाठी गोलमेज परिषद पार पडली. यामध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोलीय गणराज्य, मेक्सिको, रूस, सऊदी अरब, दक्षिण आफ्रिका तुर्की, युनायडेट किंगडम् या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, आर्थिक स्थिरता, डिजिटल पायाभूत सुविधा, महिलांच्या विकासाला चालना देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दक्षताने या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.

दक्षताचे मूळगाव संगमेश्वर तालुक्यातील मठ धामापूर असून नोकरीनिमित्त वडील गेली अनेक वर्षे देवरुख केशवसृष्टी येथे वास्तव्याला आहेत. दक्षताचे पहिले ते सातवी शिक्षण देवरुख शाळा क्र. 4 या शाळेत, आठवी ते दहावी मिनाताई ठाकरे विद्यालय साडवली, अकरावी व बारावी शिक्षण (कला शाखा) देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात झाले. अर्थशास्त्र विषयात पदवीपर्यंत शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून घेतले. स्पेशल पोस्ट ग्रॅज्युएशन बेंगलोर येथील अजिम प्रेमजी महाविद्यालयातून केले. याची दखल घेत शासनाने दिल्ली येथे आयआयटी शैक्षणिक प्रोजेक्टसाठी तिची निवड केली. दक्षता गेली दोन वर्षे दिल्ली येथे असोसिएट अ‍ॅडवायझर म्हणून कार्यरत आहे.

जादूच्या प्रयोगाचीही आवड
दक्षताने वयाच्या 12 व्या वर्षी ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन, जागतिक बाल साहित्य संमेलन व देवरुख येथील कोकण विभागीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून नावलौकिक मिळवला आहे. जादूचे 100 हून अधिक प्रयोग सादर करत रसिकांकडून कौतुकाची थाप मिळविली आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट स्पीड स्पीच जादूगार म्हणून दक्षता हिचा सन्मान करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 05-05-2025