राजापूर, 05 मे 2025: पोलिस भरतीच्या आमिषाने राजापूर तालुक्यातील मोरोशी येथील एका तरुणाला 4 लाख 90 हजार 906 रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित ज्ञानेश वसंत पांचाळ (वय 32, रा. शेर्पे, कणकवली, सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी लवेश यशवंत कानडे (रा. मोरोशी, राजापूर, सध्या रा. अंबिकानगर, जोगेश्वरी पूर्व) हे पदवीधर असून सध्या नोकरी करत आहेत. त्यांची संशयित ज्ञानेश पांचाळ याच्याशी ओळख झाली होती. ज्ञानेशने लवेश यांना पोलिस दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि विश्वास संपादन केला. त्यानंतर, पोलिस भरतीसाठी सुतार नावाच्या लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगून लवेश यांच्याकडून 4 लाख 90 हजार 906 रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता त्याने फसवणूक केली.
गुन्हा दाखल : हा प्रकार डिसेंबर 2020 ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान घडला. लवेश यांच्या तक्रारीनुसार, राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक अमित यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा बनावट नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये आणि संशयास्पद व्यक्तींबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 06/May/2025













