खेड : कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारीमार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. महामार्गावरील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगरकटाई करण्यात आली असून, नवीन महामार्ग भुयारीमार्गे वळवण्यात आला आहे. या ठिकाणी भोगावच्या हद्दीत घाट रस्त्याला पाच ते दहा मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.
येत्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्यास भुयाराकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कशेडी घाटरस्त्यावर भेगा पडल्याने भूस्खलन होऊन नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महामार्ग प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सद्यः स्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे.
भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरड कोसळल्यास अथवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील वाहतूक कशेडी घाटातील जुन्या रस्त्यावरून वळवता येऊ शकते; परंतु हा रस्ताच जर कमकुवत असेल तर मात्र महामार्गावरील वाहतूक पावसाळ्यात ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कशेडी घाटातील जुन्या रस्त्याची डागडुजी करून हा मार्ग
सुस्थितीत करण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे.
सद्यःस्थितीत कशेडी घाटाला पर्याय असलेल्या बोगद्यातूनच वाहतूक सुरू आहे; परंतु या बोगद्यात भरउन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात या बोगद्यातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवत्यास कशेडी घाटाचा रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यातील रोजचा प्रवास जिकिरीचा होणार आहे- संदीप शिरावले, वाहनचालक
कशेडी घाटातील भोगाव हद्दीत रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्या ठिकाणी बॅरिकेड्स् लावण्यात आली आहेत. रस्ता सुस्थितीत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत- पंकज गोसावी, राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अभियंता
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 06/May/2025














