रत्नागिरी : स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे (पणजी) लहान मुलांसाठी कोंकणस्वर प्रतिभा ही शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांना अभिजात संगीताकडे आकर्षित करण्यासाठी आणि हा शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे खास आयोजन केले आहे.
ही स्पर्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कारवार, अंकोला, कुमटा, होनावर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, ठोकूर, मंगलोर या कर्नाटक राज्यातील क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय गायनासाठी खुली आहे. प्रत्येक सहभागीने छोटा ख्याल सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धा ५ ते १३ वयोगटासाठी आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, स्पर्धकांनी त्यांचे गायनाचे व्हिडिओ आयोजकांना १५ मेपूर्वी पाठवावे. व्हिडिओमध्ये तबला व हार्मोनियम किंवा सारंगीसह साथसंगत आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅन्युअल किंवा डिजिटल तानपुरा चालेल. व्हिडिओ ५ ते ७ मिनिटांचा असावा. सहभागींनी सादर केलेला राग, ताल व बंदिश स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे.
अंतिम फेरीसाठी १५ स्पर्धक पात्र ठरतील. अंतिम फेरी पणजी येथे आयोजित करण्यात येईल. अंतिम फेरीत सहभागी स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३३ हजार ३३३ रुपये, द्वितीय २२ हजार २२२ रु., तृतीय ११ हजार १११ रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 06/May/2025














