दापोली वनविभागाने वर्षभरात १,०८५ पकडली माकडे

दापोली : दापोली तालुक्यात वर्षभरात तब्बल १,०८५ माकडे, तर संकटातील २०५ वन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तसेच वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानापोटी २३९ शेतकऱ्यांना २६ लाख इतकी भरपाई देण्यात आली आहे.

दापोली तालुक्यामध्ये नैसर्गिक जैवविविधता विपुल प्रमाणात असल्याने या तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे. २०२४-२५मध्ये लोकवस्तीत आलेली, संकटात सापडलेली, अनाथ असलेले, साप, अजगर, मगर, कोल्हा, घोरपड, उदमांजर, घुबड, सिगल पक्षी, मानविध असे अनेक प्रकारचे २०५ वन्यप्राणी एसओपी पद्धतीने रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दरम्यान, बाजारपेठ, शाळा, घराच्या आवारात उपद्रवी ठरणाऱ्या १,०८५ माकडांना पकडण्यात आले आहे. केळशी, केळशी बाजारपेठ, उटंबर, उंबरशेत, आसूद, आंबवली बु, रोवले, आडे, लोणवडी, अडखळ, आसूद, दापोली अर्बन सायन्स कॉलेज, जालगाव, शिर्दे, खेर्डी, बोडीवली, मौजे दापोली, सारंग मोहल्ला, कळंबट, पालगड, सोंडेघर, बांधतिवरे, कुडावळे, कोंगळे, ताडील, शिवाजीनगर किरांबा, मडवळे या गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यासाठी औरंगाबाद येथून समाधान गिरी यांचे पथक दाखल झाले होते.

वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथक प्रमुख, वनपाल रा. द. खोत व सहकारी वनरक्षक दि. वि. जगताप, वि. द. झाडे, शु. रा. भिलारे, शु. दा. गुरव तसेच वाईल्ड अॅनिमल, रेस्क्युअर, सामाजिक संस्था यांच्या मदतीने या वन्य प्राण्यांना पकडण्यात आले.

शेतकऱ्यांना २६ लाखांची पीक नुकसानभरपाई
दापोली तालुक्यामध्ये २०२४-२५मध्ये सर्वाधिक पीक नुकसान भरपाई दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. यामध्ये २३९ शेतकऱ्यांना सुमारे २६ लाख इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई त्रिसदस्यीय समिती सदस्य वनरक्षक, कृषी सहायक, तलाठी यांच्यामार्फत देण्यात आली.

२५ मृत जनावरे
दापोली वनविभागांतर्गत २०२४-२५ या वर्षात वन्यप्राणी बिबट, मगर यांच्या हल्ल्यामध्ये पाळीव प्राणी बकरी, पाडा, गाय, बैल अशा एकूण २५ जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना ४ लाख नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 06/May/2025