रत्नागिरी : ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याच्या परिसरात प्राचीन काळातील मनोरंजनाचा भाग असलेला पटखेळ ‘मंकला’चे आणखी काही अवशेष हाती लागले आहेत. इतिहास अभ्यासक स्नेहल बने यांनी केलेल्या अथक परिश्रमातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्यांना या किल्ल्यावर या खेळाचे काही अंश आढळले होते, परंतु आता नव्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी ‘मंकला’चे अवशेष मिळाल्याने रत्नदुर्गच्या इतिहासातील मनोरंजनाच्या पद्धतींवर प्रकाश पडला आहे.
हे पुरातन अवशेष किल्ल्याच्या तीन प्रमुख ठिकाणी शोधले गेले आहेत. यात महादरवाजा, दीपगृह आणि भगवती मंदिराच्या जवळच्या हनुमान मंदिर परिसराचा समावेश आहे. या ठिकाणी २४ खड्यांचा एक मोठा ‘मंकला’ (ज्यात १२ खडे उभ्या आणि १२ खडे आडव्या रांगेत आहेत) आणि १२ खड्यांचे आणखी दोन ‘मंकला’ असे एकूण तीन पट १ मे रोजी स्नेहल बने यांना अभ्यासादरम्यान दिसून आले.
‘मंकला’ हा खेळ मूळतः आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणावर खेळला जात असे. दक्षिण आफ्रिकेत हा खेळ ‘बाव’ नावाने प्रसिद्ध आहे. जगभरात खेळल्या जाणाऱ्या या खेळाचा इतिहास सुमारे ३५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो आणि इजिप्तमधील कर्नाक येथील उत्खननात याचे प्राचीन अवशेष सापडले आहेत. आफ्रिकेतून लोकांचे स्थलांतर आणि व्यापारामुळे हा खेळ मध्य आणि दक्षिण आशियात पसरला. बाराव्या शतकात या खेळाचे दोनशेहून अधिक प्रकार अस्तित्वात होते, असे मानले जाते.
भारतातील विविध राज्यांमध्ये या खेळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. दक्षिण भारतात ‘अलीगुली माने’, ‘चिने माने’, ‘हरलुमाने’, ‘पिचकी माने’, ‘गोटू गुणी’, ‘पलंगुजी’ तर महाराष्ट्र आणि हिंदी भाषिक प्रदेशात ‘सातगोल’, ‘सातगोटी’, ‘गोगलगाय’ आणि कोकणात ‘गुरूपल्याण’ या नावांनी हा खेळ आजही काही ठिकाणी खेळला जातो. रायगडसह कोकणच्या इतर भागांमध्येही या खेळाचे जुने अवशेष यापूर्वी सापडले आहेत.
‘मंकला’ खेळण्यासाठी आयताकृती लाकडी फळीवर समोरासमोर प्रत्येकी पाच, सहा किंवा सात खड्डे कोरलेले असतात. खेळायला सुरुवात करताना प्रत्येक खड्ड्यात पाच कवड्या ठेवल्या जातात. पूर्वी काही संपन्न घराण्यांमध्ये हा खेळ धातूमध्ये आकर्षक नक्षीकाम करून बनवलेला असे. या खेळात सोंगट्या म्हणून कवड्यांव्यतिरिक्त रंगीत खडे, धान्य, बिया आणि काहीवेळा मौल्यवान रत्नांचाही वापर केला जाई.
स्नेहल बने यांनी या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल बोलताना सांगितले की, भारतातील अनेक प्राचीन लेण्यांमध्ये विविध प्रकारचे बैठे खेळ कोरलेले आढळतात आणि त्यापैकी ‘मंकला’च्या अवशेषांची संख्या अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेत तर हा खेळ राष्ट्रीय बैठे खेळ म्हणून ओळखला जातो. ‘वारी’, ‘मॅकोन’, ‘सोरो’ यांसारखी काही परदेशी नावेही जगभरात या खेळासाठी प्रसिद्ध आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘मंकला’चे पुन्हा अवशेष मिळणे हे या ऐतिहासिक स्थळाच्या भूतकाळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 08/May/2025














