रत्नागिरीतील नव्या एस.टी. स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

रत्नागिरी : गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरीतील अत्याधुनिक अशी एस.टी. बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली असून, दि. ११ मे रोजी या बसस्थानकाचे लोकार्पण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, नव्या बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, कोणतेही गैरकृत्य होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र असे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिस चौकी, दिवस रात्र सुरक्षा रक्षकांचा पहारा या नव्या बस स्थानकावर असणार आहे.

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गेली सात वर्ष सुरु होते. त्यामुळे प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस सहन करून बसस्थानकाबाहेरील शेडमध्ये प्रवासी थांबत होते. नवीन, सुसज्ज असे बसस्थानक लवकर बांधा अशी मागणी नागरिकांची होत होती. अखेर त्याला यश आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून १७ कोटी रुपये खर्च करीत रत्नागिरीत नवी मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत उभी राहिली आहे.

अत्याधुनिक, सुसज्ज अशा नव्या इमारतीमुळे रत्नागिरी शहराच्या वैभवात वेगळी भर पडली आहे. एकुण १८ प्लॅटफॉर्म असून १० वेगवेगळ्या प्रकारचे गाळे आहेत. तसेच आरक्षण खिडकी, पार्सल विभाग, कंट्रोल रूमची व्यवस्था, स्वच्छतागृह, उपहारगृह, प्रवाशांसाठी थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. महिलांना बसण्यासाठी व लहान मुलांना दूध पाजण्यासाठी वातानुकुलित हिरकणी कक्ष ठेवण्यात आला आहे. मागील सव्वा वर्षात या कामाला वेग आला. पालकमंत्र्यांसह आमदार किरण सामंत यांनी यात लक्ष घालून ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना सूचना करत हे बसस्थानक लवकर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

फेब्रुवारी २०२४ मध्ये रखडलेल्या या कामासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १७.५० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंतर सव्वा वर्षात ही भव्य व आकर्षक एसटी स्टॅण्डची इमारत उभी राहिल्याचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. माळनाका येथील एसटी कर्मचारी वसाहत. विभागीय मध्यवर्ती कार्यालय, विरंगुळा विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध करुन पालकमंत्री सामंत यांच्यामुळे या सर्व इमारतींचे रुपडे बदलले आहे.

मागील सात वर्षांपासून एसटी बसस्थानक नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठी समस्या येत होती. मोठा त्रास ही सहन करावा लागला. आता नवीन बसस्थानक सुरू होतोय ही शहराच्या दृष्टीने फार चांगली बाब असून याचा आम्हाला आनंद होत आहे. वस स्थानक जरी सुसज्ज झाले असले तरी बसेस चांगल्या सोडाव्यात तसेच एसटीचे वेळापत्रक चांगल्या पध्दतीने करणे गरजेचे आहे. –देविदास पाटील, प्रवासी, रत्नागिरी

नव्या बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून ११ मे रोजी सायंकाळी ५ वा. या बसस्थानकाचे लोकार्पण होणार आहे. नवे बसस्थानक सुसज्ज असून प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली असून विविध सुविधा ठेवण्यात आले आहे. एस.टी. बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष करण्यात आले आहे. – बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 09/May/2025