मुंबई : नामांकित उद्योजक रतन टाटा यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात रतन टाटांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योग, मनोरंजन, राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देशासह जगभरातून रतन टाटा यांना आदरांजली वाहिली जात आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राने रतन टाटा यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यासोबत महाराष्ट्र शासनाने रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याची माहिती दिली. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. पुढील वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
“रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्रामार्फत दिला जाणार आहे. तसेच नरिमन पॉईंट येथे फार मोठं उद्योग भवन उभं करण्यात येत आहे. त्याची रचना ही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्याची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन त्यांची स्मृती आणि त्यांचे काम कायमस्वरुपी लोकांच्या लक्षात राहायला हवं,” असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 10-10-2024














