खेड : वडगाव बुद्रुक गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत तक्रार

खेड : खेड तालुक्यातील मौजे वडगाव बुद्रुक गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कामांची चौकशी करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीचे उपाध्यक्ष सचिन अनाजी मोरे यांनी केली होती.

याबाबत राज्य शासनाचे कक्ष अधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी जीवन प्राधिकरण ठाणे येथील कोकण विभाग मुख्य अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. एक महिन्यात या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार, अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीचे उपाध्यक्ष सचिन मोरे यांच्या तक्रारीची दखल घेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासनाने संबंधित कार्यकारी अभियंत्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने दिलेल्या पत्रानुसार, मोरे यांनी दिलेल्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेऊन तांत्रिक पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या
मागणीसाठी ७ एप्रिल रोजी आनाजी मोरे व सहकारी यांनी आझाद मैदानात उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल घेऊन याबाबत राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे.

गावकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचे कक्ष अधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी दिलेल्या आदेशांमध्ये ठाणे येथील मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वातील दक्षता पथका मार्फत या तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव येथील पाणी योजनेची चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक स्वयंस्पष्ट अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या आदेशांची मुदत आता काही दिवसांतच संपणार असल्याने वडगाव बुद्रुक येथील नदीवर बांधण्यात आलेल्या अनुक्रमे २० लाख व ५० लाख रुपयांचे बंधारे व कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजनेत निकृष्ट दार्जाचे काम केलेले ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 09/May/2025