रत्नागिरी : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
२ जूनपर्यंत करा अर्ज
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी २ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर २ जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
अनुदानावर मिळणार गाय, म्हैस,
राज्य व जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप केले जातात. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते.
काय आहे योजना ?
सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.
कागदपत्रे काय लागतात ?
सातबारा उतारा, ८ अ उतारा, अपत्य दाखला, स्वयंघोषणा पत्र, आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल), अनुसूचित जाती/जमाती असल्याचा जातीचा दाखल्याची सत्यप्रत आदी कागदपत्रे लागतात.
कोणाला अर्ज करता येणार?
जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर आणि अँड्रॉइड मोबाइलवरून २ जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी १९६२ या निःशुल्क क्रमांकावर, तसेच पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 09/May/2025














