नाणीज येथे धावत्या गाडीचा टायर फुटून पाचजण जखमी

रत्नागिरी : चालत्या गाडीचा पुढील टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. अपघाताची ही घटना गुरुवार ८ मे रोजी सायंकाळी ४ वा. सुमारास नाणीज येथे झाली.

नीलेश गुरुदास गवस (वय ३६), गुरुदास आप्पा गवस, गितांजली गुरुदास गवस, नेहा नीलेश गवस, सुकन्या निवेश गवस (सर्व रा. पिकुळ ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. याबाबत नीलेश गवस यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील गाडी (एमएच-०७-एजी-७५९८) मधून आपल्या कुटुंबासह असुर्डे गुरववाडी, संगमेश्वर येथे एका लग्नासाठी आले होते. सायंकाळी ते लग्न कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा पिकुळे सिंधुदुर्ग येथे कोल्हापूर मार्गे जात होते.

ते नाणीज गावी आले असता, त्यांच्या चालत्या गाडीचा पुढील टायर फुटला. त्यामुळे गाडी रस्त्याला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला.

या अपघातामध्ये नीलेश गवस यांच्या डोक्याला उजव्या बाजूला दुखापत झाली. तर त्यांचे वडील गुरुदास आप्पा यांच्या डोक्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, आई गितांजली गवस यांच्या पायाला व तोंडाला, पत्नी नेहा गवस यांच्या डाव्या पायाला आणि मुगली सुकन्या गवस हिला मुका मार लागला आहे. या अपघातात गाडीचेही नुकसान झाले असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 10/May/2025