रत्नागिरी, दि. १० मे २०२५: भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमुळे रत्नागिरी पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून, नवीन रजा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. विशेषतः सागरी किनाऱ्यावरील गस्तीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवण्यात आले आहे.
सागर सुरक्षा सदस्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संशयित बोटी आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्यास सांगण्यात आले आहे. सागरी लँडिंग पॉइंटवर विशेष गस्त घालण्यात येत आहे. तसेच, नागरिकांना संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित ११२ या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे आणि सागरी हद्दींवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल सज्ज आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर दहशतवाद्यांकडून देशातील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दि. ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते दि. २३ मे २०२५ रोजी रात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अंतर्गत प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
या आदेशांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले आहे. सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत पोलिस दल आणि नागरिकांचे समन्वयित प्रयत्न जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 10-05-2025
