इयत्ता १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूल, विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेज कला, श्रीमान रमेश कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै. सौ. विजयालक्ष्मी (गोडुताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी कॅप्टन ठाकूर सभागृह येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरीचे कार्यवाह श्री. धनेश रायकर हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांचे स्वागत व परिचय प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. रुपेश पंगेकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भरघोस बक्षीसे प्रदान करण्यात आली .

यावेळी कला शाखेतील प्रथम क्रमांक प्राप्त आणि तिनही विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी निकिता माशाळे, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली रूतुजा झोरे तसेच विज्ञान शाखेतून प्रथम आलेला धीरज हरचकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागील शिक्षक व पालकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर संस्थेचे पदाधिकारी भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री . श्रीराम भावे, कार्यवाह श्री. धनेश रायकर , विश्वस्त श्री .विनायक हातखंबकर तसेच प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत उचित ध्येय निश्चिती , त्यासाठी योग्य परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात श्री. धनेश रायकर यांनी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून समाजाभिमुख कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीम. योगिनी भागवत यांनी प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. लवंदेसर यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 26-05-2026