गुहागर : जिल्ह्यातील संगणक परिचलाकांचे वेतन गेले पाच महिने रखडलेले आहे. नोव्हेंबर २०२४ पासून वेतनापासून वंचित असून, त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
दुसरीकडे दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढत असून, प्रशासकीय पातळीवरून कामासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक कोंडीसह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ८३२ ग्रामपंचायतींमध्ये १३५ पुरुष तर २७७ महिला असे एकूण ४१२ संगणक परिचालक आहेत. बहुसंख्य संगणक प्रचालक या महिला आहेत; मात्र त्यांचे वेतन अनेक महिने थकविले गेल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
या परिचालकांना मासिक १० हजार वेतन आहे. या वेतनवाढीसाठी त्यांना कित्येक वर्ष झुंजावे लागले. वेतनवाढ काही महिन्यांपूर्वीच झालेली असतानाच दुसरीकडे गेले सहा महिने वेतन रखडवून ठेवण्यात आले आहे. संगणक परिचालकांवर शासन व कंपनीकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे होणारा अन्याय सुरूच आहे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन आणि मासिक २० हजार रुपये मानधन मिळणे या प्रमुख मागण्या आहेत. कित्येकवेळा मोर्चे व आंदोलने झाली. यावर ग्रामविकास मंत्रालय नेहमीच आश्वासने देत आले आहे; मात्र, अद्यापही आश्वासने पूर्ण केलेली नसल्याने संगणक परिचालकांच्या नोकरीवर मोठा परिणाम होत आहे.
नवनवीन कामांची जबाबदारी
प्रत्येक संगणक परिचारकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार असतो. त्यामुळे त्या कामाचा ताण अगोदरच वाढलेला असताना तालुका प्रशासनाकडून नवनवीन कामे लादली जातात. अॅग्रोस्टिकच्या कामही संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केले. तरीही नोव्हेंबर २०२४ पासूनचे वेतन झालेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 10-05-2025
