खेड : खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

खेड : खेड पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परेश उदय शिंदे (रा. बोरज), सुरज सुरेंद्र पड्याळ (रा. बोरज) आणि सुरज दिलखुश तांबे (रा. निगडे) अशी या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत खंडणी तसेच धमकी व मारहाणीच्या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी विशाल घोसाळकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी आणि दरमहा दहा हजार रुपये देण्याची मागणी केली होती.

आरोपींनी फिर्यादीला मुंबईतील एका मोठ्या गँगची भीती दाखवली आणि खोट्या गुन्ह्यात फसवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या फिर्यादीने आरोपींना एक लाख रुपये दिले. यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

अटक टाळण्यासाठी आरोपींनी खेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मृणाल जाडकर आणि फिर्यादी विशाल घोसाळकर यांच्या वतीने अॅड. सुधीर शरद बुटाला यांनी युक्तिवाद केला. अॅड. बुटाला यांनी युक्तिवाद करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला दिला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपींकडून खंडणीची रक्कम वसूल करायची आहे आणि त्यासाठी त्यांना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन देऊ नये, असा जोरदार युक्तिवाद त्यांनी न्यायालयात मांडला.

अॅड. सुधीर बुटाला आणि सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादाची दखल घेत, न्यायालयाने आरोपी परेश शिंदे, सुरज पड्याळ आणि सुरज तांबे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 10/May/2025