राजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणात खडखडाट झाल्याने राजापूर शहर वासियांना शुक्रवार ९ मे पासून नगर परिषद प्रशासनाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राजापूर करांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साहेबाच्या धरणातून व शीळ येथील जॅकवेलकडून विद्युत पंपाने पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उष्ण तापमानामुळे कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने या पुर्वी १६ एप्रिल पासून प्रशासनाने शहर वासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.
आता कोदवली धरणातील पाण्याची पातळी पुर्णपणे खालावुन कोदवली धरणाकडून तालिमखाना साठवण टाकीकडे येणारा पाणीपुरवठा पुर्णपणे ठप्प झाल्याने प्रशासनाकडून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या निर्णयाचा फटका नागरिकांना बसणार असून नागरिकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या केवळ शीळ जॅकवेलकडील पाणी पुरवठयावरच शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.
मात्र या ठिकाणी विद्युत पंपाने पाणी खेचले जात असल्याने विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शिळ जॅकवेलकडून होणारा विजपुरवठा ठप्प होत आहे. त्यामुळे तालिम खाना साठवण टाकीत आवश्यक तेवढा पाणी साठा होण्यात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आता शहर वासियांना दोन दिवसा आड पाणी पुरवठयाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 10/May/2025
