खेड : तालुक्यातील आयनी येथे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. बौद्धवाडी क्र. १, शेरी, घागुर्डा या वाडीत रस्ता डांबरीकरणाचा थांगपत्ताच नाही. पिण्याच्या पाण्याची अवस्थाही दयनीय आहे. जानेवारी ते मे दरम्यान प्रत्येक वाडीला जेमतेमच पाणी मिळत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागत आहे.
आयनी-बौद्धवाडी क्र.१, शेरी, घागुर्डा येथे ३९ लाख एवढा निधी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मंजूर झाला होता. पाण्याची विहीर, जलकुंभ बांधण्यासाठी ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनीही जमिनी बक्षीसपत्र करून दिल्या होत्या. विहिरीच्या बांधकामास सुरूवातही झाली. पाण्याचा जलकुंभही बांधण्यात आला. काही ठिकाणी जलवाहिनीसाठी
पाईप अर्धवट टाकण्यात आले. २०१२ नंतर बंद झालेले काम आजमितीसही ठप्प आहे.
याबाबत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्यापही राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झालेली नाही. यामुळे सलग ५ महिने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवणच करावी लागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पायाभूत सुविधांचा अभावच असून शासनाच्या योजनांचाही लाभमिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निधी मंजूर होवूनही ग्रामपंचायतीकडून कामांची पूर्तता न करता ग्रामस्थांना वेठीस धरले जात असल्याचा आरोपही तीनही वाडीतील ग्रामस्थांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 10/May/2025
