रत्नागिरी, दि. १९ मे २०२५: रत्नागिरीतील आझाद नगर बस स्टॉप परिसरात १७ मे २०२५ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाच्या उत्सवातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मोहम्मद शेख समीर काझी (वय २५) यांच्यावर चाकू आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आली. या घटनेत फिर्यादी यांची सोन्याची चैन, अंगठी आणि पाकीटही गहाळ झाले आहे. रत्नागिरी पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद काझी हे रात्री आझाद नगर बस स्टॉपजवळून जात असताना तिथे आफताब शहबान बलबले याचा वाढदिवस साजरा होत होता. बॅनर लावून आणि केक कापून हा उत्सव सुरू होता. काझी यांनी काय चालले आहे हे पाहण्यासाठी गाडी बाजूला थांबवली. यावर आफताब बलबले याने त्यांना उद्दामपणे विचारले, “तुझ्या बापाचा रस्ता आहे का?” याला काझी यांनी प्रत्युत्तर देताना कोणाच्याही बापाचा रस्ता नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आफताबने आपल्या साथीदारांना काझी यांना मारहाण करण्यास सांगितले. त्याने स्वतः काझी यांच्या शर्टची कॉलर पकडून केक कापण्याच्या चाकूने त्यांच्या छातीवर दोन ठिकाणी वार केले. याच वेळी शहबाज गणी बलबले उर्फ गुड्डू, साहिल बावानी आणि शादाब बलबले यांनी लोखंडी सळ्यांनी काझी यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. इतर सात ते आठ जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत स्थानिक रहिवासी मुकद्दर यांनी मध्यस्थी करून काझी यांची सुटका केली. काझी यांनी आपला भाऊ नायब आणि आईला घटनास्थळी बोलावले. काझी यांच्या आईने आरोपींना त्यांच्या मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारला असता, शहबाज आणि आफताब यांनी त्यांच्यावर धावून जाऊन शिवीगाळ केली आणि “आमच्याकडे मोठे सूरे आहेत, तुमच्या घरातील लोकांना साफ करू,” अशी धमकी दिली.
या प्रकरणी १८ मे रोजी पहाटे ५:४९ वाजता रत्नागिरी पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १८९(१)(२), १९०, १९१(२), ११८(१), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक २०६/२०२५ नोंदवला गेला. आरोपींमध्ये आफताब शहबान बलबले, शादाब बलबले, साहिल बावानी, शहबाज गणी बलबले, नवाज आणि अरबाज यांच्यासह १० ते १२ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 19-05-2025












