रत्नागिरी : खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे एकूण १२ हजार ९०९ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत युरियाची एकमेव रेक आली असून, २५६१ मेट्रिक टन खताची आवक झाली आहे.
युरिया खताचा वापर सर्वाधिक होत असला तरी एम. ओ. पी, डी. ए. पी, संयुक्त खते, एस. एस. पी. यासारख्या खतालाही शेतकऱ्यांकडून मागणी असते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. नाचणीची १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. खरीप हंगामात ८० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असते.
जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिके घेण्यात येत असून, पेरणी, लागवड व लागवडीनंतर खताची मात्रा पिकाला देण्यात येत असल्याने खतांना मागणी आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. शिवाय आंबा संपल्याने बागायतदारांनी कलमांची साफसफाई, खते देण्यासाठी अळी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यावर्षी उष्मा भरपूर असल्यामुळे शेतकरी शक्यतो मिश्रखतांचा वापर करू लागले आहेत. मंजूर खत साठ्यापैकी २,५६१ मेट्रिक टन खत आले असून, उर्वरित खत टप्प्याटप्प्याने येणार आहे.
३८१ क्विंटल बियाणे प्राप्त
रत्नागिरी जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे ७४२४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे, मात्र अद्याप ३८१ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. पेरणीपूर्व बियाणांची उपलब्धता शेतकऱ्यांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 20/May/2025













