जगबुडी पुलावरील तीव्र उतारामुळे अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित जगबुडी पुलावर तीव्र उतार असलेल्या ब्लाइंड स्पॉटवर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातामध्ये तब्बल पाच जणांचा नाहक बळी गेला. याला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची बाब या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

महामार्गावरील नवा जगबुडी पूल अपघाताचा केंद्रबिंदू ठरत असून, तीव्र उतार अन् लागलीच वळण असल्याने वाहनचालकांना या वळणाचा अंदाज येत नाही. त्यात पुलावरून जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्याने वाहने थेट नदीपात्रात कोसळतात. ती या ठिकाणी कोणतीच उपाययोजना नाही. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा तीव्र उतार आणि लागलीच वळण असल्याने या ठिकाणी वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याची बाब यापूर्वी झालेल्या अपघातातून निदर्शनास आली आहे. असे असताना प्रशासनाकडून अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. दोन जोड पुलांच्यामध्ये असलेली मोकळी जागा हीच आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

यापूर्वी या पुलावर अनेक मोठमोठे अपघात झाले आहेत. वाहने नदीपात्रात कोसळली आहे. जगबुडी पूल वळणावळणाचा बनवला गेल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने ब्लाइंड स्पॉट जाहीर करण्यात आला आहे; मात्र त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असताना प्रशासन मात्र आणखी किती बळी घेणार, हा प्रश्न विचारला जात आहे. दोन पुलांच्या मध्यभागी असलेली धोकादायक जागा लोखंडी जाळीने झाकली जाण्याची मागणी होत असताना त्याकडे पूर्णतः डोळेझाक केल्याने पाच बळी गेले असल्याचा आरोप होत आहे.

हे अपघात थांबणार नाहीत
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हे वाहन खाली गेले त्या ठिकाणी लोखंडी जाळी किंवा संरक्षण भिंत बांधून हे अपघात थांबणार नाहीत, अपघात होतच राहतील. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी आमचे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रोड सेफ्टी सल्लागार यांच्याशी चर्चा करून कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 20/May/2025